प.पू.श्री. नारायणसरस्वती (परमानंद) हे महान नाथ संप्रदायी साधू होते. प.पू.श्री. गजानन महाराज गुप्ते यांचे हे मानवी गुरू. यांचे संपूर्ण भारत वर्षभर अखंड भ्रमण असे. त्यांचे अंतिम वसतिस्थान बुलढाणा जिल्ह्यातील रानअंत्री ता.चिखली येथे आहे. ते लोकेषना, वित्तेषना व दारेषना यापासून अलिप्त असत. भक्तांची आत्यंतिक आंतरिक तळमळ असेल तेव्हा ते प्रकट होऊन त्यास दर्शन देऊन कृतार्थ करीत असत. ते जेव्हा रानअंत्री किंवा जांभोरा या ठिकाणी रहात असत तेव्हा दूरवरून हजारो भक्तगण त्यांच्या दर्शनास येत असत. त्यांच्या दर्शनाने भक्तजनास परमानंद होई. ते कधी झाडावर तर कधी झाडाखाली तर कधी विहीरीच्या काठावर ध्यानस्थ बसल्याचे आढळून येई. ते कधी तरूण तरी कधी वृद्ध दिसत. कधी कधी ते या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना दिसून येत. कधी अशक्त (कृश) तर कधी धिप्पाड दिसत. अशा त्यांच्या विविध लिला व चमत्कार सहजी होत म्हणून ते म्हणत की, आपण त्यांना विशेष महत्व देऊ नये. ते ईश्वररूप महान साधू होते.
महाराजांचे वसतिस्थान श्री क्षेत्र जांभोरा अत्यंत रमणीय होते. जवळच एक मोठा चौक. त्याचे मध्यभागी एक पुरातन साधू येल्लोबा यांची समाधी होती. चौकाच्या चारी बाजूस सभोवार दालने असून विटांची, चुनेगच्चीनी बांधलेली काही भुयारे होती. दालनात उजेड पडेल अशी व्यवस्था होती. चौकाजवळ दाट झाडीत एक विहीर असून तिचे पाणी फार चवदार होते. तेथे लोक बसून जपजाप्य, स्नानसंध्या वगैरे करून तेथेच भोजन करीत. चौकातील ओट्यावर महाराजांची गादी पसरलेली असून त्यावरच महाराज बसलेले असत.
महाराजांनी देहरूपाने कार्तिक वद्य १२ (द्वादशीस) शके १८३२ तारीख १४ नोव्हेंबर १९१० रोजी इहलोक सोडला. त्यांचे वय तेव्हा ११७ वर्षाचे होते.
त्यांचा जन्म पैठणपासून सुमारे चाळीस मैलावर गोदावरीचे काठी दहिठण येथे झाला. त्यांचा वंशपरंपरा व्यवसाय सराफीचा होता. ते स्वत: लहान असतानाच पितृछत्र हरवून बसले. अर्थात संगोपनाची जबाबदारी आईने समर्थपणे पार पाडली. मौजीबंधन वगैरे तिनेच केले. परंतू मातृछत्रही त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी हरपले. आईच्या अस्थी नाशिकला रामकुंडात विसर्जन करण्यासाठी ते घेऊन आले ते पुन्हा परत घरी गेलेच नाहीत. पुढे ते उत्तरेकडे पंजाब प्रांती गेले व गुरूमुखी भाषा शिकून तेथे बराच काळ राहिले. त्यांचा जीवनक्रम कुठे कुठे व्यतीत झाला तो पुढीलप्रमाणे-
१६ वर्षे पंजाब प्रांतात, त्यातील काही वर्षे राया रामचंद दफ्तरदार यांचेबरोबर दक्षिण हैदराबादेत गेली. ६ वर्षे चारोधाम यात्रा, ७ वर्षे करत वाडी, ६ महिने नेतनशा, ६ वर्षे जाफरबाद, ६ वर्षे वरूड, ४ वर्षे सातेगाव-सावंगी, ७ वर्षे कसबाखेड, १ वर्षे अमासरी, ७ वर्षे जळगांव, १२ वर्षे पालखेड, १३ वर्षे बेराले, ३॥ वर्षे अंबासी, १३ वर्षे रानअंत्री असा महाराजांचा संपूर्ण देशभर प्रवास झाला आहे.

No comments:
Post a Comment